गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन....
गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन......
एखाद्या व्यक्तीच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजातील प्रचलित समजुतींप्रमाणे व रूढींप्रमाणे किंवा नोकरशाही पद्धतीने व्यक्तीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन केल्यास अत्यंत चुकीचे निष्कर्ष निघतात. आयुष्याच्या प्रारंभी ज्या व्यक्तींना अतिसामान्य किंवा निकृष्ट दर्जाचे समजले जात होते त्याच व्यक्ती पुढे जाऊन जगप्रसिद्ध बनल्या. अशा व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेतल्याने आयुष्यात सतत प्रेरणा मिळत राहते.
जगप्रसिद्ध लोकांचे यश एक उदाहरण आणि प्रेरणा असू शकते. ही मत्सराची सामान्य भावनासुद्धा असू शकते किंवा, उदाहरणार्थ, प्रामाणिक प्रशंसा - कोणत्याही परिस्थितीत, एखाद्याचे प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश हे आपल्याला अधिक कठोर आणि चांगले काम करण्यास उत्तेजित करू शकते.
मानवी इतिहासात जगप्रसिद्ध झालेल्या अनेक महान व्यक्तींना त्यांच्या बालपणात आणि अगदी लहानपणापासूनच, अगदी मूर्ख नसले तरी मंदबुद्धीचे मानले गेले होते.
वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी उशीरा बोलायला सुरुवात केली! आईन्स्टाईनने शाळेत असताना भौतिकशास्त्र किंवा गणितामध्ये कोणतीही विशेष क्षमता दर्शविली नव्हती. आणि इतर सरासरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी बुद्धिमान गणला जायचा. आयझॅक न्यूटनदेखील शाळेत भौतिकशास्त्रात मागे होता. त्याला शाळेत भौतिकशास्त्र आणि गणित खूप अवघड वाटत होते.
लहान असताना, संशोधक जेम्स वॅट अक्षरशः मानसिकदृष्ट्या मागास समजला जायचा. जोनाथन स्विफ्ट आणि कार्ल गौस शाळेत कमी हुशार होते आणि ते निस्तेज व अक्षम असल्याचे मानले जात होते. कॅरोलस लिनियस याला - तू चांभार बन - असे सुचविण्यात आले होते. भित्रा व निर्विकार डेमोस्थेनिस एके दिवशी ग्रीसचा सर्वात मोठा वक्ता बनला. हेल्महोल्ट्झ याला त्याच्या शिक्षकांनी निर्बुद्ध समजले होते, तर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने वॉल्टर स्कॉटला सांगितले की तो मूर्ख आहे आणि तसाच राहील.
चार्ल्स डार्विनच्या वडिलांना वाटत होते की, आपला मुलगा एक सामान्य मुलगा आहे. चार्ल्स डार्विनचा त्यांच्या वडिलांनी निषेध केला होता. ते म्हणाले की, “तुला शिकार करणे, कुत्र्यांशी खेळण्याशिवाय आणि उंदीर पकडण्याशिवाय कशाचीही पर्वा नाही आणि तू स्वत:साठी आणि आपल्या सर्व कुटुंबासाठी एक कलंक आहेस.” परंतु डार्विनच्या वीस वर्षांहून अधिक काळापर्यंत केलेले परिश्रम, त्याच्या “On the origin of species by means of natural selection” या पुस्तकात त्याचे प्रतिबिंब उमटले आणि त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली आणि विज्ञान समृद्ध केले. संपूर्ण मानव जातीला माहित नसलेली निसर्गाची रहस्ये या पुस्तकामधून जगाला समजली. थोर रशियन नाट्यलेखक निकोलाय गोगोल (१८०९ -१८५२) यांनी लहानपणी नित्कृष्ट दर्जाचे निबंध लिहिले होते.
प्रसिद्ध रशियन लेखक व विडंबनकार मिखाईल शेक्रिन यांनी एकदा शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलीसाठी एक निबंध लिहिला आणि "रशियन भाषेचे अल्प ज्ञान" या टिप्पणीसह त्या निबंधास "ड" दर्जाचा शेरा मिळाला. प्रसिद्ध रशियन लेखक, कथाकार अँटोन चेखोव्ह याला त्याच्या शालेय निबंधांत "क" दर्जाच्या शेऱ्यापेक्षा जास्त कधीच मिळालेले नव्हते.
परीक्षेतील गुण नेहमीच एखाद्या व्यक्तीची बौद्धिक झेप निश्चित करण्यात मदत करत नाहीत आणि वास्तविक कामाच्या क्षमतेपेक्षा ज्ञानाच्या बेरजेचे मूल्यांकन करतात हे जगप्रसिद्ध व्यक्तींच्या पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
मॅक्सिम गॉर्की ऑपेरा गायकांसाठीच्या निवड परीक्षेत उत्तीर्ण झाला तर फ्योडोर शालियापिन अनुत्तीर्ण झाला होता व फ्योडोर शालियापिनची वृत्तपत्रात पत्रकाराच्या नोकरीसाठी निवड झाली होती पण मॅक्सिम गॉर्कीला पत्रकाराच्या नोकरीसाठी डावलण्यात आले होते; पण प्रत्यक्षात पुढे जाऊन फ्योडोर शालियापिन हा जगप्रसिद्ध ऑपेरा गायक बनला, तर मॅक्झिम गॉर्कीने वृत्तपत्रातून लघुकथालेखनास प्रारंभ करून लवकरच जगप्रसिद्ध लेखक बनला. जेम्स वॅट, हेल्महोल्ट्ज आणि जोनाथन स्विफ्ट यांना त्यांच्या शाळांमध्ये सामान्य मानण्यात आले होते, ज्युसेप्पे वर्दी यांना मिलान संगीत महाविद्यालयामध्ये नावनोंदणी नाकारण्यात आली होती. प्रत्यक्षात पुढील आयुष्यात ज्युसेप्पे वर्दी हे जगप्रसिद्ध ऑपेरा रचनाकार बनले. ज्युसेप्पे वर्दी जिवंत असताना त्यांचे नाव मिलान संगीत महाविद्यालयाला देण्याचे ठरवले गेले होते, परंतु करिअरच्या सुरुवातीस मिलान संगीत महाविद्यालयामध्ये नावनोंदणी नाकारण्यात आल्याचा राग मनात धरून त्यांनी ही बाब साफ धुडकावून लावली. त्यांच्या मृत्यूनंतरचं मिलान संगीत महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. हेगेलच्या ग्रॅज्युएशन डिप्लोमामध्ये असे लिहिले होते की, त्याच्याकडे चांगली क्षमता होती परंतु ज्ञान कमी होते आणि तो तत्त्वज्ञानात पूर्णपणे अज्ञानी आहे. पण प्रत्यक्षात पुढील आयुष्यात हेगेल जगप्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता बनला.
वैज्ञानिक संशोधनासाठी कोणतीही शैक्षणिक पदवी किंवा विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. अँपिअर आणि फॅरडे यांनी कोणतेही विशेष शिक्षण घेतले नव्हते, व्होल्टा जेसुइट धार्मिक शाळेत शिकला होता, ज्यूल एक दारू बनवणारा होता, कोपर्निकस, हेल्महोल्ट्झ आणि मेयर डॉक्टर होते, एव्होगाड्रो, लॅव्हॉइसियर आणि फ्रेंच गणितज्ज्ञ फेरमॅट हे मूळ व्यवसायाने वकील होते, मेंडेल हा धर्मगुरू होता… महान रशियन फिजिओलॉजिस्ट इवान पावलोवने ख्रिश्चन धर्मगुरु बनण्यासाठीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. परंतु नंतर तो शास्त्रज्ञ बनला. आपल्या लघुकथांसाठी जगप्रसिद्ध असलेला रशियन लेखक अँटोन चेखोव्ह हा डॉक्टर होता. चेखोव्हने मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच लघुकथा प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. "मेडिसिन माझी कायदेशीर पत्नी आहे तर लेखन ही माझी रखेल आहे. एकीचा कंटाळा आला की मी दुसरीकडे जातो" असे चेखोव्हने एका पत्रात लिहिले होते.
मोझार्टने वयाच्या चौथ्या वर्षी हार्पसीकॉर्ड हे वाद्य वाजवण्यास सुरुवात केली, पाचव्या वर्षीच त्याने संगीत लिहिले, आठव्या वर्षी त्याने त्याचा पहिला सोनाटा आणि सिम्फनी तयार केली आणि अकराव्या वर्षी - त्याचा पहिला ऑपेरा. त्याचवेळी, बर्याच घटनांमध्ये सर्जनशील क्षमता एखाद्या व्यक्तीच्या मध्यम वयामध्ये किंवा अगदी वाढत्या वयात प्रकट होते. असे बरेच लोक आहेत ज्यांनी संस्कृती आणि विज्ञानाच्या इतिहासात खोल ठसा उमटवला आहे, जरी त्यांची प्रतिभा लगेच समोर आली नाही आणि काही प्रकरणांमध्ये तर खूप उशिराने प्रकट झाली.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, प्रारंभिक चाचण्या एखाद्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता प्रकट करत नाहीत किंवा त्याच्या क्षमतांचे मोजमाप करत नाहीत, विशेषत: या क्षमता वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची सर्जनशील प्रतिभा, उदाहरणार्थ, जेव्हा तो तरुण वयात पोहोचतो किंवा अगदी परिपक्वता गाठतो तेव्हा उदयास येऊ शकतो, म्हणूनच एखाद्या व्यक्तीने लहानपणी कोणतीही विशिष्ट प्रतिभा दाखवली नसली तरीही व्यक्तींना त्यांच्या क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
प्रख्यात रशियन लेखक सर्गेई अक्साकोव्ह याने त्याचे पहिले पुस्तक वयाच्या ५६ व्या वर्षी लिहिले, तोपर्यंत त्याने काहीही लिहिले नव्हते. आणखी एक सुप्रसिद्ध रशियन लेखक इव्हान गोन्चरॉव्ह (१८१२-१८९१) यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर कथालेखन सुरू केले.
सर वॉल्टर स्कॉट यांनी आपली पहिली ऐतिहासिक कादंबरी वयाच्या ४३व्या वर्षी लिहून पूर्ण केली. सुप्रसिद्ध प्रतिभावान रशियन संगीतकार प्योत्र चायकोव्हस्की याची अलौकिक बुद्धी तुलनात्मकदृष्ट्या उशीरा बहरली, वयाच्या २० ते २५ दरम्यान. सोव्हिएत संगीतकार अराम खाचाटुर्यन यांनी वयाच्या १९ व्या वर्षी संगीत शाळेत प्रवेश केला. निकोलई लुझिन, हा नामांकित सोव्हिएट गणितज्ज्ञ शाळेत गणितात कमकुवत होता आणि त्याला विशेष प्रशिक्षण घ्यावे लागले होते. जर्मन संगीतकार रिचर्ड वॅग्नर वीस वर्षांचा होईपर्यंत संगीताचे नोट्स वाचू शकत नव्हता.
व्रुबेल (चित्रकार) प्रथम तो सत्तावीस वर्षांचा होता तेव्हा आपले पहिले चित्र रेखाटले. सुप्रसिद्ध प्रतिभावान रशियन संगीतकार प्योत्र चायकोव्हस्की याला पियानोसुद्धा नीट वाजविता येत नव्हता. लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर काही काळ त्याने क्लार्कची नोकरी केली. त्यानंतर तो संगीत रचना रचू व लिहू लागला.
आयुष्यभर सामान्य जीवन जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर असं कळतं की, ती व्यक्ती महान होती आणि नंतर ती व्यक्ती जगप्रसिद्ध बनते व संपूर्ण मानवी जीवनावर छाप टाकते. विज्ञानात अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मेंडेल हा धर्मगुरू होता. त्याने बागेत वाटाण्याच्या झाडावर १८५६ ते १८६८च्या दरम्यान संशोधन करून निष्कर्ष काढले होते व त्यावेळच्या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले होते. पण या संशोधन लेखांकडे शास्त्रीय तज्ज्ञांनी दुर्लक्ष केले होते. मेंडेलने वंशाची संख्या आणि प्रकाराचा मागोवा ठेवत १०,००० वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग केले होते. त्यावेळेस मेंडेल हा सर्वसामान्य माणूस म्हणून जीवन जगत होता. १८८४ साली मेंडेलचा मृत्यू झाला. परंतु सन १९०० साली तीन शास्त्रीय संशोधकांना जुन्या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांचा अभ्यास करीत असताना असे आढळून आले की, मेंडेलने केलेले संशोधन हे मानवी जीवनास कलाटणी देणारे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन असून मेंडेल हा महान शास्त्रज्ञ आहे. अशाप्रकारे जिवंतपणे सर्वसामान्य जगणारा ग्रेगोर मेंडेल हा मृत्यूनंतर सोळा वर्षांनी सर्वकालिन महान शास्त्रज्ञांच्या पंक्तीत जाऊन बसला. मेंडेलने त्याच्या मठातील बागेत प्रयोगांच्या माध्यमातून आनुवंशिकतेची मूलभूत तत्त्वे शोधली. त्याच्या प्रयोगांमधून असे दिसून आले की वाटाण्याच्या वनस्पतींमधील विशिष्ट गुणधर्मांचा वारसा विशिष्ट नमुन्यांचे पालन करतो. हा शोध आनुवंशिकतेच्या अभ्यासाचा व आधुनिक जनुकशास्त्राचा पाया बनला. १८६५ ते १९०० पर्यंत मेंडेलचे कार्य अपरिचितच राहिले कारण तो वैज्ञानिक नव्हता तर धर्मगुरू होता.
रशियन कृषिशास्त्रज्ञ निकोलाय वाविलोव याचे १९४३ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुरुंगात निधन झाले. परंतु सन १९६० ते १९६५च्या दरम्यान रशियन शास्त्रीय संशोधकांना जुन्या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांचा अभ्यास करीत असताना असे आढळून आले की, निकोलाय वाविलोवने केलेले संशोधन हे कृषी संशोधनास कलाटणी देणारे महत्त्वपूर्ण संशोधन असून वाविलोव हा महान शास्त्रज्ञ आहे. १९६५ साली सोविएत रशियात महत्वपूर्ण राजकीय बदल झाला आणि वाविलोवच्या गुणवत्तेची दखल घेणाऱ्या संशोधकांकडे सूत्रे आली. आज निकोलाय वाविलोव हा रशियामध्येे डार्विनच्या पंक्तीत जाऊन बसणारा महान शास्त्रज्ञ म्हणून गणला जातो. "विज्ञानाच्या केवळ छोट्या प्रगतीसाठी मी आपला जीव देण्यास मागेपुढे पाहणार नाही..." हे उदगार वाविलोव याचेच आहेत.
एका जवळच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात वाविलोवने लिहिले होते "मी माझ्या अभ्यास खोलीत मायकेलएंजेलोच्या 'डेव्हिड' आणि 'मोझेस' ह्या शिल्पांची चित्रे टांगून ठेवली आहेत आणि जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा मला मायकेलएंजेलोचे चरित्र नेहमी आठवते, त्याने ऍपेनिन्सपासून आपले शिल्प कोरण्यासाठी संगमरवरी दगड कसे मिळवले? आणि दुःख सहन केले, बहिष्कृत होण्याची वेदना आणि शतकानुशतके अतुलनीय राहिलेल्या गोष्टी त्याने कशा कोरल्या?. सर्व अडथळ्यांना न जुमानता एखाद्याने स्वतःच्या मार्गाने जाणे आवश्यक आहे."
अल्बर्ट आइनस्टाईन (१८६९-१९५५) याने एकदा नमूद केले होते की, प्रसिद्ध रशियन लेखक दोस्तोव्हस्कीने लिहिलेल्या दोन पानांनी त्याला गणितज्ञ कार्ल फ्रेडरिक गॉस (१७७७-१८५५) च्या सर्व पुस्तकांपेक्षा अधिक प्रेरणा दिली.
इंजिनिअरिंग कॉलेजात वारंवारपणे ज्या शास्त्रज्ञाच्या उल्लेख केला जातो तो निकोलस कार्नोट सादी याचे थर्मोडायनामिक्समधील संशोधनदेखील दुर्लक्षित केले गेले होते. 1832 साली सादीच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तू जाळण्यात आल्या होत्या. परंतु अत्यंत सुदैवाने त्याने संशोधन करुन निष्कर्ष ज्या वहीत लिहिले होते ती वही मात्र चमत्कारिकरित्या जळण्यापासून वाचली होती. सादीने जिवंत असताना एक पुस्तक देखील लिहिले होते. हे पुस्तक काही संशोधकांच्या हातात पडले त्यावरून या संशोधकांनी सादीने केलेल्या संशोधन निष्कर्षाची माहिती जमवण्यास सुरुवात केली तेव्हा वरील वही संशोधकांच्या हाती पडली आणि या वहीत लिहिलेल्या संशोधन निष्कर्षामुळे सादी महान शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास आला. "आदर्श कार्नोट इंजिन", "कार्नोट चक्र (cycle)", "कार्नोटचे तत्व", "कार्नोटचे प्रमेय" ...इत्यादी शब्द आज इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये वारंवार ऐकू येतात.
दुर्दैवाने त्याच्या कार्याचा इतर शास्त्रज्ञांद्वारे केलेला गौरव पाहण्यासाठी तो जगला नाही. कार्नोटने गणना केली की 1 घन मीटर पाणी 1 मीटर उंचीवर चढवण्यासाठी व 1 किलो पाणी 2.7°C डिग्री सेल्सिअसने गरम करण्यासाठी सारखीच ऊर्जा लागते (योग्य आकडा 2.3°C डिग्री सेल्सिअस आहे). निकोलस कार्नोट याने हिट इंजिनचे थिअरॉटिकल मॉडेल तयार केले आणि जेव्हा त्याचा शोध जगासमोर आला, तेव्हा स्टीम बॉयलर अधिक कार्यक्षमतेने काम करू लागले.
जेम्स मॅक्सवेलने विद्युतचुंबकीय लहरीबद्दल केलेल्या संशोधनाचीदेखील त्याच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी दखल घेण्यात आली. मॅक्सवेलच्या सिद्धांताने सुचवले की, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी प्रयोगशाळेत निर्माण केल्या जाऊ शकतात. ही शक्यता मॅक्सवेलच्या मृत्यूच्या आठ वर्षांनंतर, 1887 मध्ये जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्झ याने प्रथम प्रयोगशाळेत सिद्ध केली. परिणामी वायरलेस कम्युनिकेशन (रेडिओ आणि आता मोबाईल फोन) ह्या शोधांचे मूळ मॅक्सवेलच्या प्रकाशनांमध्ये (साहित्य) आहे. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ बोल्ट्झमान याने विद्युत चुंबकीय लहरीचे गुणधर्म प्रदर्शित करणारे मॅक्सवेलचे चार समीकरण पाहून "ही समीकरणे देवाने तर लिहिली नाहीत नां?" असे उदगार काढले होते.
जीवनातील प्रतिकूल परिस्थिती आयुष्यात प्रतिभेचा बहर येण्यास कधीच रोखू शकत नाही हे जगप्रसिद्ध व्यक्तींच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. जिद्द, चिकाटी व प्रचंड सहनशक्ती हे जग प्रसिद्ध व्यक्तींचे प्रमुख गुण होते.
जेंव्हा मायकेल फॅरडेने आपल्या शोधाचे प्रात्यक्षिक ब्रिटिश पंतप्रधानांसमोर करुन दाखवले तेंव्हा "या चुंबकीय खेळण्यांचा समाजासाठी काय उपयोग?"असा शेरा ब्रिटिश पंतप्रधानांनी मारला होता. परंतु कांही वर्षातच या शोधावर आधारित इलेक्ट्रिक मोटर व इलेक्ट्रीक जनरेटरची निर्मिती शास्त्रीय संशोधकांनी केली. त्यामुळे मानवी जीवनात प्रचंड क्रांती झाली. नंतर मात्र ब्रिटिश सरकारने इलेक्ट्रीक मोटर व जनरेटरवर कर बसवून कमाई करण्यास सुरुवात केली.
जवळजवळ दहा वर्षे मायकेल फॅरेडे लोहचुंबक, तारेची वेटोळी, प्रवाहमापक आपल्या खिशात ठेवून फावल्या वेळात त्यावर प्रयोग करीत असे. आणि दहा वर्षांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अखेर एके दिवशी त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. लोहचुंबक किंवा तारेची वेटोळी ही स्थिर न ठेवता पुढेमागे हलविल्यास विद्युत प्रवाह तयार होतो. अशाप्रकारे फॅरेडेने चुंबकीय क्षेत्रापासून वीज कशी तयार करावी याचा शोध लावला.
महान रशियन लेखक गॉर्की लहानपणी फारच कमी काळ म्हणजे काही महिनेच शाळेत गेला. मॅक्झिम गॉर्की रशियन मुळाक्षरे आपल्या आजोबांकडून शिकला. लहानपणी मॅक्झिम गॉर्कीला शाळेला जाण्याऐवजी हॉटेलमध्ये, लॉन्ड्री व दुकानात काम करावे लागत असे. तेथील मालक भरपूर काम करून घेत असे, अधूनमधून उपाशी ठेवणे, बेदम मारहाणही करत असे. त्याने लहानपणी फावल्या वेळात पुस्तके वाचून मोठ्या कष्टाने ज्ञान संपादन केले. वयाच्या सतराव्या वर्षी मॅक्झिम गॉर्कीला विद्यापीठात प्रवेश हवा होता. परंतु शालेय शिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला. खरं तर वयाच्या सतराव्या वर्षी मॅक्झिम गॉर्कीचे शैक्षणिक कौशल्य हे त्याच्याच समवयीन नियमितपणे शाळेत जाणाऱ्या मुलांइतकेच होते. याच वयात मॅक्झिम गॉर्कीचे एक सुंदर युवती मारिया डेरेन्कोवा हिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील खडतर बालपण व बेकारी यामुळे आपले प्रेम प्रकरण यशस्वी होणार नाही, याची जाणीव झाल्याने मॅक्झिम गॉर्कीने आत्महत्येचा प्रयत्न केला. गॉर्कीला हृदयाच्या भागात रिव्हॉल्व्हरने गोळी मारायची होती, परंतु गोळी अवघ्या दोन मिलीमीटरने चुकली. हा प्रकार जवळच असलेल्या नाईट वॉचमन व्यक्तीने पाहिला. हा नाईट वॉचमन जवळ नसता तर रक्तस्रावामुळे गॉर्कीचा जागीच मृत्यू झाला असता. जखमी गॉर्कीवर शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवण्यात आला.
ॲनॉटॉमीच्या पुस्तकातील मानवी छातीच्या संरचनेचा अभ्यास करूनही, तो चुकला, हृदयाला दुखापत झाली नाही, फुफ्फुसात गोळी घुसली. त्याच्या संपूर्ण आयुष्यात, मॅक्सिम गॉर्कीने एकापेक्षा जास्तवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी तो मृत्यू टाळण्यात यशस्वी झाला. 1887 मध्ये आत्महत्येच्या अनेक प्रयत्नांसाठी त्याला 7 वर्षांसाठी रशियाच्या काही भागातून तडीपार करण्यात आले. मॅक्झिम गॉर्कीने तरुणपणी एक लघुकथा लिहिली आणि खाली सही केली "मॅक्झिम गॉर्की" प्रत्यक्षात त्याचे खरे नाव होते अलेक्सी पेश्कोव. पण मॅक्झिम गॉर्की हे टोपणनाव धारण करून त्याने ही लघुकथा लिहिली. ही लघुकथा रशियातील एक राज्य जॉर्जिया ची राजधानी तिब्लिसी येथील एका वृत्तपत्रात छापून आली आणि अशाप्रकारे महान लेखक मॅक्झिम गॉर्की याच्या लेखन प्रवासास प्रारंभ झाला. त्याची "आई" ही कादंबरी जगातील 130 पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झाली आहे. हा एक विक्रमच आहे. मॅक्झिम गॉर्की याच्या स्मृतिप्रीत्यर्थ रशियातील एक शहर "निज्नी नोवोग्राड" या शहराला "गॉर्की" असे नाव दिले गेले आहे. ज्या शहरात मॅक्झिम गॉर्कीने बालपणी अतोनात हालअपेष्टा सोसल्या त्याच शहराला गॉर्कीचे नाव दिले गेले.
विज्ञानाचा प्रचार व प्रसार करून विज्ञानाची लोकप्रिय वाढवणारा लेखक म्हणून १९व्या शतकात याकोव्ह पेरेलमान हा प्रसिद्ध होता. "मनोरंजक भौतिकशास्त्र" हे त्याचे पुस्तक प्रचंड गाजले. याकोव्ह पेरेलमन याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणताही शोध लावला नव्हता. त्याने कोणतीही शैक्षणिक पदवी संपादन केली नव्हती. तरुणपणी त्याने फक्त वनीकरण पदविका (Diploma in Forestry) प्राप्त केली होती. परंतु तो विज्ञानाशी एकनिष्ठ होता आणि त्याने त्रेचाळीस वर्षे विज्ञानावर लेखन करुन विज्ञानाची लोकप्रियता वाढवली. लोकांना विज्ञानासह संवादाचा आनंद मिळवून दिला. चंद्रावर 46 कि.मी. व्यासाच्या एका खड्ड्याला याकोव्ह पेरेलमानचे नाव दिले गेले आहे.
1843 मध्ये, उत्कृष्ट शिल्पकार मार्क अँटोकोल्स्कीचा जन्म लिथुआनियामधील विल्नियस येथे एका गरीब कुटुंबात झाला. "पीटर पहिला", "येरमाक" आणि "द क्रॉनिकलर नेस्टर" ही त्याची शिल्पे त्याच्या शिल्प कौशल्यासाठी ओळखली जातात. त्याने 1868-70 ही वर्षे बर्लिनमध्ये, अत्यंत गरिबीत व कठीण परिस्थितीत घालविली. त्यानंतर 1870 मध्ये पूर्ण झालेले "इव्हान द टेरिबल" हे त्याचे शिल्प झार अलेक्झांडर (द्वितीय) या राजाने त्याच्या कलादालनासाठी विकत घेतले. ते पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आणि त्याला कला अकादमीने ॲकडेमिशियन ही पदवी बहाल केली. "मी रात्री गरीब अवस्थेत झोपलो, आणि सकाळी श्रीमंत म्हणून जागा झालो, काल मी अनोळखी होतो, पण आज मी सुप्रसिद्ध आहे." असं तो म्हणाला.
नॉन-युक्लिडियन भूमितीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून निकोलाय लोबाचेव्हस्कीचे स्मरण केले जाते. निकोलाय लोबाचेव्हस्कीचा जन्म 20 नोव्हेंबर 1712 रोजी रजिस्ट्रार या पदावर काम करणाऱ्या आय.एम. लोबाचेव्हस्कीच्या गरीब कुटुंबात झाला. हे पद रशियन साम्राज्याच्या पद-तक्त्यामध्ये "द्वितीय लेफ्टनंट"च्या बरोबरीचे होते. जन्मापासूनच गरिबी व दैन्यावस्था लोबाचेव्हस्कीच्या अवतीभवती फिरत होती. जरी त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला (तो सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे ते कुटुंब आणखी गरीब झाले), तरी लोबाचेव्हस्कीच्या आईने त्याला चांगले शिक्षण मिळावे याची दक्षता घेतली.
इंग्रजी लेखक विल्यम सॉमरसेट मॉम (१८७४-१९६५) हे एक प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याला लहानपणापासूनच गंभीर स्यूडोन्युरॉटिक तोतरेपणाचा त्रास होता आणि त्यामुळे तो लोकांशी नीट संवाद साधू शकत नव्हता. तरीही मॉमने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला, यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली परंतु नंतर तो डॉक्टर म्हणून काम करू शकला नाही कारण जेव्हा त्याने आपल्या रुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो इतका वाईट रीतीने तोतरा व्हायचा की तो कधीकधी एक शब्दही उच्चारू शकत नव्हता. जेव्हा तो पौगंडावस्थेत होता, तेव्हा मॉमच्या लक्षात आले की जर त्याने त्याला काळजी वाटेल असे काहीतरी लिहिले तर त्याला शांत वाटते आणि त्याचा तोतरेपणा कमी होतो. जेव्हा त्याने त्याच्या भावनांना लेखनात वाव दिला तेव्हा लेखनामुळे आराम वाटल्याची ही भावना प्रत्येक वेळी प्रकट झाली. यामुळे कदाचित त्याला साहित्यात जाण्यास प्रोत्साहन मिळाले आणि तो लवकरच व्यावसायिक लेखक बनला.
विज्ञानाच्या इतिहासात, प्रतिभावान अमेरिकन शास्त्रज्ञ आणि प्रयोगकर्ते थॉमस अल्वा एडिसन यांनी मेहनतीचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे. कल्पनेवरील त्यांची निष्ठा आणि कामाची विलक्षण क्षमता यामुळे ते एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले. त्यांच्या मृत्यूपर्यंत (वयाच्या ८४ व्या वर्षी), एडिसनने दिवसाचे १८-२० तास कठोरपणे काम केले.
एडिसनच्या महान वैज्ञानिक शोधांचे रहस्य काम, चिकाटी आणि अधिक काम होते. इलेक्ट्रिक लाइट-बल्बच्या फिलामेंटसाठी योग्य सामग्री शोधण्यासाठी, एडिसन आणि त्याच्या सहाय्यकांनी २०० टिपण वह्या भरून ६,००० प्रयोग केले! आणि त्यांना हवे ते सापडले. असे दिसून आले की, कार्बनयुक्त बांबू तंतू प्रदीर्घ काळासाठी समान रीतीने विकिरण करतात...
डॅनिश लेखक हान्स ख्रिश्चन अँडरसन (१८०५-१८७५), एका गरीब चांभाराचा मुलगा, जो लहान वयातच अनाथ झाला, त्याने आयुष्यात उशीरा शालेय शिक्षण सुरू केले आणि तेवीस वर्षांचा असताना विद्यापीठात प्रवेश केला. अँडरसनची कीर्ती त्याच्या परीकथांमुळे आहे, ज्यांनी गेली दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ जगभरातील मुलांना आनंदित केले आहे.
अब्राहम लिंकन (१८०९-१८६५), एक लाकूडतोड्या, जो अनेक वर्षांनंतर वकील आणि त्यानंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. प्रचंड ऊर्जा, व्यावहारिक बुद्धि आणि धैर्य हे त्याचे मुख्य गुण होते.
१८९५ मध्ये, जेम्स देवर याने लंडन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत घोषित केले की, तो हायड्रोजन वायूचे द्रवीकरण करण्याच्या मार्गावर आहे. असे करणे शक्य आहे या कल्पनेवरच त्यावेळी गंभीरपणे शंका व्यक्त आली होती. पण काही वर्षांतच देवारने ते करून दाखवले.
दहा वर्षांच्या हेनरिक श्लीमन या मुलाने स्वतःला वचन दिले की तो ट्रॉय या प्राचीन शहराचे अवशेष शोधून काढेेल आणि त्या कार्यासाठी त्याने आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि ३९ वर्षानंतर वयाच्या ४९ व्या वर्षी आपला दृढनिश्चय खरा करून हेनरिक श्लीमनने जागतिक कीर्ती मिळवली.
३,००० वर्षांपूर्वी, प्राचीन ग्रीक कवी होमरने त्याचे शक्तिशाली महाकाव्य -- "इलियड" मध्ये ट्रॉय या दुर्दैवी शहराची आणि महान ट्रोजन युद्धाची कथा सांगितली. प्रेम आणि युद्धाच्या या पौराणिक कथेने तेव्हापासून मानवी कल्पनांना मोहित केले आहे.
ट्रॉय ह्या शहराचा शोध हा पर्यटक, टोपोग्राफर, लेखक आणि विद्वानांसाठी १८व्या आणि १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात एक महत्त्वाचे ध्येय बनला होता, जेव्हा प्राचीन ग्रीस आणि ग्रीक पुराणकथांनी युरोपमधील लोकांच्या कल्पनांना मोहित केले होते.
ट्रॉय या प्राचीन शहराचा शोध हजारो वर्षांपासून कधीच थांबला नव्हता. परंतु त्या सर्व काळात, ट्रोजन युद्धाचे वर्णन असलेले होमरचे महाकाव्य प्रत्यक्षात घडले होते हे कोणीही सिद्ध करू शकले नव्हते - परंतु हे सर्व फक्त १८७९ सालापर्यंत, जेव्हा ४९ वर्षांच्या हेनरिक श्लीमनने हिसारलिक टेकडीखाली शहराचे अवशेष शोधून काढले. सध्याच्या तुर्कीच्या वायव्येकडील ट्रोआस प्रदेश. होमरने वर्णन केलेले शहर या विशिष्ट स्थानाखाली लपलेले आहे यावर विश्वास ठेवणारा श्लीमन हा कोणत्याही प्रकारे पहिलाच माणूस होता.
१८७० मध्ये जर्मन व्यवसायिक आणि स्वयं-शिक्षित पुरातत्वशास्त्रज्ञ हेनरिक श्लीमन याने ट्रॉय हे शहर उत्खननाद्वारे शोधण्याच्या उद्देशाने अनातोलिया या शहराचा प्रवास केला आणि "इलियड" हे महाकाव्य वस्तुस्थितीवर आधारित असल्याचे सिद्ध केले. अशाप्रकारे पुरातत्वशास्त्राचे प्रणेते म्हणून प्राचीन ट्रॉय शहराची जागा शोधून काढणाऱ्या हेनरिक श्लीमनचे नाव जगप्रसिद्ध झाले.
कॉन्स्टँटिन शिकोलोव्स्की हा एका गरीब पोलिश स्थलांतरिताच्या पोटी जन्मलेल्या १८ मुलांपैकी पाचवा होता. वयाच्या १० व्या वर्षी, त्याला ताप (स्कार्लेट फिवर) आला आणि यामुळे त्याच्या श्रवणशक्तीवर प्रचंड परिणाम होऊन तो अर्धवट बहिरा झाला, हा एक आजार ज्याने त्याला त्याच्या समवयस्कांपासून वेगळे केले. यामुळे वयाच्या १४ व्या वर्षी त्याला शाळेतून निलंबित करण्यात आले होते. त्याने केवळ काही वर्षांचेच शालेय शिक्षण घेतले होते.
पुढे त्याने कालुगा या छोट्या शहरातील शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे प्रवेश करण्यासाठी मल्टीस्टेज रॉकेटच्या निर्मितीची कल्पना करणारा शिकोलोव्स्की हा पहिलाच माणूस होता आणि १९११ मध्ये जेव्हा हा प्रकल्प पूर्णपणे विज्ञान रंजन कथालेखक ज्युल्स व्हर्नच्या प्रांतात असल्याचे दिसत होते तेव्हा शिकोलोव्स्कीने, विविध आकृत्या, कागदोपत्री हिशोब व वर्णनांद्वारे मल्टीस्टेज रॉकेटद्वारे पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे प्रवेश केला जाऊ शकतो असे कागदोपत्री सिद्ध करून दाखवण्याचे मौल्यवान कार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा